हदगाव| नंदी महाराज देवस्थान कवाना येथे भरलेल्या यात्रेच्या निमित्ताने लायन्स इंटरनॅशनलच्या सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब ऑफ नांदेड मिडटाऊनच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला यात्रेतील भाविकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


दत्तात्रय विश्वनाथ हुरणे प्रतिष्ठान आपल्या परंपरेचा पाया असलेला ७५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास पूर्ण करून अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, लायन राजेंद्र हुरणे व मिसाळे परिवाराच्या वतीने स्व. विश्वनाथ आप्पा हुरणे यांच्या स्मरणार्थ हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण १७२ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या सोयीप्रमाणे रुग्णालयात बोलावून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात रुग्णालयातील गजानन व कोमल यांनी नेत्र तपासणी केली.


लायन्स क्लब ऑफ नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष लायन विश्वजीत राठोड, सचिव लायन शिरीष गीते, कोषाध्यक्ष लायन लक्ष्मण पुपलवाड तसेच प्रकल्प संचालक एम.जे.एफ. लायन राजेंद्र हुरणे व एम.जे.एफ. लायन राजश्री हुरणे यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी लायन सतीश सामते, लायन विजय होकर्णे यांची उपस्थिती होती.

लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

