हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्गावरील उमरचौक, श्री परमेश्वर मंदिर कमान, रेल्वे स्थनाकाकडे जाणाऱ्या मुख्य चौरस्त्यावर दिवसेंदिवस किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्या करिता शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस अल्प संख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फेरोजखान पठाण यांनी केली आहे.
भोकर ते वणी अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करण्यात येवून रस्ता विस्तारीकरणाचे काम हिमायतनगर शहरातून करण्यात आले आहे. भोकर कडून हिमायतनगर नवीन दारलूम पर्यत काम वेगाने पुर्ण करण्यात आले. मात्र दारूलूम पासून इस्लापूर मार्गे किनवटकडे जाण्याऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने तेही अर्धवट करण्यात आले आहे. शासनाच्या अंदाज पत्रकानुसार शहरातून डिवायडर बसवून काम पुर्ण करणे गरजेचे असताना तसे न करता काम पुर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सुसाट धावणाऱ्या गाड्या आणि इतर वाहने एकमेकाला धडकून नित्य अपघात होत आहेत. आत्तापर्यंत शेकडो अपघात झाले असून, दुचाकीवरून पडून अनेक महिलांना गंभीर मार लागल्याचे सर्वश्रुत आहे. तर काही अपघातांना अनेकांना अपंगत्व आले आहे.
यास कारणीभूत केवळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर डिवाडर नसल्याने आणि वाहणे अति वेगाने जात येत असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. मोठे तर अपघात होताच आहेत किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. अश्या परिस्थितीत भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्याकरता उमरचौक आणि श्री परमेश्वर मंदिर कमान आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या भागात गतिरोधक बसविण्यात यावे. अशी मागणीही काँग्रेस अल्प संख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण यांनी केली आहे. तात्काळ गतिरोधक बसविल्या गेले नाहीतर यासाठी आंदोलन उभारावे लागेल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागावर राहील असा इशाराही त्यांनी दिला.