नांदेड| नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात ऐन पोळा सणाच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अतिवृष्टी, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या निधनाचा मानसिक धक्का बसून, आईने देखील अवघ्या २४ तासांत प्राण सोडले. या दुहेरी आघातामुळे फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.


कंधार तालुक्यातील फुलवळ गावातील सूर्यकांत लक्ष्मणराव मंगनाळे (४६) हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततची नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे ते काही दिवसांपासून चिंतेत होते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या सोयाबीन व कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतीशिवाय अन्य उत्पन्नाचे साधन नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या विवंचनेतून गुरुवारी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.


गुरुवारी सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे दुःख गाव अजून विसरलेही नव्हते तोच दुसरा धक्का बसला. मुलाच्या मृत्यूचा मानसिक आघात सहन न झाल्याने देऊबाई मंगनाळे (७०) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. दुपारी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर तसेच गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरण लक्षात घेऊन पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला.




