नांदेड| आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व्हेक्षण देखील करण्यात येत आहे.काँग्रेस पक्ष हा कुठलीही जात, धर्म, पंथ असा कुठलाही भेदभाव न करता उमेदवारी देणारा पक्ष आहे. त्यामूळे त्यामध्ये दिव्यांगांनी मागणी केली तर काँग्रेसकडून दिव्यांगांना देखील निश्चितपणे विधानसभेची उमेदवारी देऊ, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मालेगाव रोड येथील भक्ती लाॅन्स येथे आयोजित तीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्ताने प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,सभागृनेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसिम खान,खासदार वसंतराव चव्हाण आदिसह अन्य काही मान्यवरांची पत्रकार परिषद नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिव्यांग संघटनेचे नेते तथा पत्रकार राहुल साळवे यांनी पाहिलाच प्रश्न उपस्थित केला असता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यावर उत्तर देताना बोलत होते.