हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील बरडशेवाळा येथील अल्पभूधारक शेतकरी मनोहर लक्ष्मण जमधाडे (वय ५५) यांनी २६ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.


गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत सतत होत असलेली नापिकी, तसेच शेतीवर केलेला खर्चही वसूल न होणे यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याशिवाय हदगाव स्टेट बँकेचे कर्ज फेडण्याची विवंचना त्यांना सतावत होती. या आर्थिक व मानसिक ताणातून बाहेर पडता न आल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन इंगोले, जमादार रावळे व पोलीस कर्मचारी अतुल नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाचे बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेचा पुढील तपास मनाठा पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
मयत मनोहर जमधाडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.



