Homeनांदेडमंगरूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

मंगरूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

मागील पाच वर्षांतील कामे, निधी खर्च, टॅक्स वसुली आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी; विद्यमान ग्रामसेवकाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मागील पाच वर्षांतील विकासकामे, निधी खर्च, आर्थिक व्यवहार, पाणीपुरवठा कामे तसेच टॅक्स वसुलीतील व्यवहारांची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी हिमायतनगर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. विशेषतः निलंबित ग्रामसेवकाच्या नावाने स्वाक्षरी करून रक्कम उचलण्याचा प्रयत्न झाला का? या व्यवहारामागे नेमके कोण जबाबदार आहे? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत विद्यमान ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील व्यवहारही तपासले जाणार का…? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

७ लाख ४० हजारांच्या रकमेचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
उपोषणकर्त्यांनी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी निलंबित झालेल्या तत्कालीन ग्रामसेवक रावसाहेब कामाजी खिल्लारे यांच्या स्वाक्षरीने ७ लाख ४० हजार ००३ रुपये उचलण्यात आल्याचा आरोप केला असून, या संपूर्ण व्यवहाराची कागदपत्रांसह चौकशी करण्याची मागणी केली आहे. निलंबित ग्रामसेवकाच्या नावाचा वापर करून रक्कम उचलण्यात आली असल्यास त्यामागील जबाबदार व्यक्ती कोण..? असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅक्स वसुलीच्या पावत्यांची तपासणी करण्याची मागणी
ग्रामपंचायतीद्वारे नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांच्या वसुलीच्या पावत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली आहे का? असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कर वसुलीची रक्कम, नागरिकांना देण्यात आलेल्या पावत्या, ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेली रक्कम आणि संबंधित नोंदी व पावती क्रमांक यांची ताळमेळ तपासल्यास कथित अनियमितता समोर येऊ शकते, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे.

विकासकामांचा हिशोब कुठे?
मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. सी.सी. रस्ते, सी.सी. बंधिस्त नाली तसेच पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून खर्चाच्या कागदपत्रांशी त्याची पडताळणी करावी, अशी मागणी आहे.

IMG20260814130720 01 मंगरूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
oplus_16

पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीवर ११ हजार ९२१ रुपये ७८ पैसे खर्च दाखवूनही गावातील पाण्याची समस्या कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कामाची गुणवत्ता, प्रत्यक्ष खर्च आणि निधीचा वापर यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचे अकाउंट स्टेटमेंट, मागील पाच वर्षांतील आवक-जावक रजिस्टर, विकासकामांची बिले, व्हाउचर, टॅक्स वसुलीच्या पावत्या आणि निधी खर्चाच्या नोंदी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकशी होणार की प्रकरण दडपले जाणार?
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत एकापाठोपाठ एक गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना प्रशासन या आरोपांची निष्पक्ष चौकशी करणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. निलंबित ग्रामसेवकाच्या नावाचा वापर करून रक्कम उचलण्याचा प्रकार, टॅक्स वसुलीतील कथित अनियमितता आणि विद्यमान ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी झाल्यास नेमके काय समोर येते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

ग्रामस्थांनी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

उपोषणात गंगाधर पांडलवाड, विठ्ठल खंदारे, महाराज गुलझेरवाड, नारायण सादलवाड, चांद्रराव जललवाड, अंकुश आंबेकर, मारोती पैलवाड, प्रकाश गुलझेरवाड, श्रीराम सुटेवाड, प्रवीण दासरवाड, संतोष शिरगिरे, संजय रुद्रबोईनवाड यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. आता प्रशासन या गंभीर आरोपांची चौकशी करून सत्य बाहेर आणणार की..? ग्रामपंचायतीच्या कारभारावर पडदा टाकणार, याकडे मंगरूळ ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments