HomeनांदेडLiquor Ban Awareness : श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दरेगावात दारूबंदीचा एल्गार; ५६वे गाव...

Liquor Ban Awareness : श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दरेगावात दारूबंदीचा एल्गार; ५६वे गाव व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांची जनजागृती

पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा अवैध दारू विक्रेत्यांना कडक इशारा; नागपंचमीच्या दिवशी जुगाराची कुप्रथा बंद करण्याचे आवाहन

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्याच्या पवित्र सुरुवातीच्या दिवशी हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव येथे दारूबंदी व व्यसनमुक्तीचा निर्धार करण्यात आला. भुयारातून प्रकट झालेल्या प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिराच्या परिसरात हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांची विशेष जनजागृती बैठक घेण्यात आली.

हिमायतनगर पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी तालुक्यातील गावागावांत दारूबंदी व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास ५५ गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली असून, श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दरेगाव हे ५६वे गाव व्यसनमुक्तीच्या मोहिमेत सहभागी झाले.

बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी दारू, जुगार आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबव्यवस्था तसेच सामाजिक वातावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकला. “दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतात. व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबाची प्रगती आणि मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला प्राधान्य द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

FB IMG 1786754994473 Liquor Ban Awareness : श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दरेगावात दारूबंदीचा एल्गार; ५६वे गाव व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांची जनजागृती

अवैध दारू विक्रेत्यांना स्पष्ट इशारा – गावातील नागरिकांना दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करतानाच अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी स्पष्ट आणि कडक इशारा दिला. गावातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या कोणत्याही अवैध प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. कोणीही बेकायदेशीरपणे दारू विक्री करू नये, अन्यथा पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपंचमीच्या दिवशी जुगाराला ‘नो एंट्री’ – तालुक्यात काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी जुगार खेळण्याची कुप्रथा असल्याचे निदर्शनास येते. ही प्रथा मुळापासून बंद करण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके तयार करण्यात आली आहेत. सण-उत्सव आनंदाने साजरे करा; मात्र जुगार, दारू किंवा इतर अवैध प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्रे यांनी केले. “मुख्य रस्त्यावर किंवा सार्वजनिक परिसरात दारू पिऊन अथवा जुगार खेळून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

‘चांगला अधिकारी मिळाला, हे तालुक्याचे नशीब’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या व्यसनमुक्ती मोहिमेचे कौतुक केले. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात प्रभावी जनजागृती मोहीम राबवून हिमायतनगर तालुका व्यसनमुक्त करण्याचा निर्धार कौतुकास्पद आहे. केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांवरही पुढाकार घेणारा अधिकारी तालुक्याला मिळाला, हे हिमायतनगरचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर, व्यसनमुक्तीचे प्रचारक विठ्ठलराव देशमवाड, अशोकराव अनगुलवार यांच्यासह दरेगावातील प्रमुख नागरिक व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. दारूबंदीचा संदेश, व्यसनमुक्तीचा निर्धार आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी—या त्रिसूत्रीने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी दरेगावातून सामाजिक परिवर्तनाचा नवा संदेश देण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments