किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी येथे दि 28 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू असताना सदस्यांनी हिशोबाची मागणी करताच सरपंचबाईने अभिलेखे हातात घेऊन सभात्याग केल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी 29 मार्च रोजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कारभारावर रोष व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले असून जोपर्यंत गटविकास अधिकाऱ्याकडून चौकशी होणार नाही तोपर्यंत टाळे खुलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे. यावर आता गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे अंबाडीवाशीयांचे लक्ष लागून आहे.


किनवट तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतचा कारभार या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान दि 28 मार्च 2025 रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ शितल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभेचे आयोजन केले होते. फोरम पूर्ण असल्याने सभा सुरू झाल्यानंतर उपसरपंच व सदस्यांनी मागील मासिकसभा,ग्रामसभा आणि विकासनिधी खर्चावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देता न आल्यामुळे चिडलेल्या सरपंचबाईने सभा सुरु असताना अभिलेखे व काही कागदपत्रे हातात घेऊन सभा त्याग केल्याने एकच गोंधळ उडाला.


अर्धवट सभेमुळे संतापलेल्या सदस्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला धारेवर धरले असता सरपंचाच्या ताब्यातील अभिलेखे व ईतर कागदपत्रे स्वतःकडे घेऊन उद्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहिन असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी मनीष येवते यांनी दिले होते.

परंतु दि 29 मार्च रोजी ते सुद्धा गैरहजर राहिल्याने सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या एकतर्फी व मनमानी कारभाराला वैतागून उपसरपंच दीपक तामगाडगे, सदस्य लक्ष्मण ठमके,आनंदराव हलवले, रमेश हलवले, दत्ता खडसे, व्यंकटी पंडलवार, संजय भवरे, पोचिराम भवरे, उमेश मुनेश्वर, बळवंत देठे, किशन आडे, अंबादास गेडाम, साहेबराव हलवले, प्रमेश्वर सिसले, पोषट्टी नक्कावार, मारोती पेंदोर, उल्हास भवरे, बंटी भवरे, भास्कर नक्कावार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी अंबाडी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून रोष व्यक्त केला आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे अंबाडी येथे येऊन पंचनामा करत नाहीत तोपर्यंत आम्ही टाळे खोलू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून याप्रकरणी आता गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे अंबाडीवाशीयांचे लक्ष लागून आहे.

मागील महिन्याची मासिक सभा कोरम अभावी तहकुब झालेली असतानाही कागदोपत्री सभा दाखवून सरपंच शितल जाधव व ग्रामविकास अधिकारी मनीष येवते यांनी पाणीपुरवठा योजना अंतर्गत टाकी बांधकामाचे 80 लक्ष रुपये परस्पर उचल केले. कालच्या सभेतील विषय चर्चेसाठी ठेवला होता. आपला आर्थिक गैरव्यवहार उघड होईल या भीतीपोटी सरपंचाने सभेतून काढता पाय घेतला. या निमित्ताने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी हे सांगनमताने विकास कामात अपहार करतात हे स्पष्ट झाले. अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हिरामण ठमके, ग्रा. प. सदस्य अंबाडी.