नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुल आणि पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या रोजगारभिमुख अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे.
या कोर्ससाठी देश पातळीवरील नामांकित संस्था एफटीआयआय तील अध्यापक रितेश ताकसांडे साधन व्यक्ति म्हणून लाभणार आहेत. या कोर्समध्ये प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून कथा सांगण्याचे कौशल्य शिकविण्यात येणार आहे. सहभागींना प्रॅक्टिकल प्रशिक्षण, विविध तंत्रज्ञानाचा वापर याबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे युवकांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल आणि त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहितीसाठी एफटीआयआय आणि ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी. या कोर्सला नाव नोंदणी दि. १५ ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे. या कोर्ससाठी देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. तरी नांदेड परिसरातील इच्छुकांनी या कोर्ससाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले आहे.