छत्रपती संभाजीनगर| सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या कोरोना काळातील ग्रामीण भागातील परिस्थितीचे दर्शन घडविणाऱ्या कथांचा ‘माझं गाव माझी माणसं’ या संग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नामवंत प्रकाशक बाबा भांड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर वाडेवाले व प्रा. गणेश मोहिते हे होते. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत इसाप प्रकाशनाचे प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक करताना रा. रं. बोराडे गुरुजींचे साहित्य म्हणजे सुवर्णकण आहेत. ते हरवू न देता सारे एकत्र करून वाचकांच्या हाती दिले पाहिजेत असे विचार मांडले. यानंतर बाबा भांड यांच्या हस्ते ‘माझं गाव माझी माणसं’ या संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना बोराडे गुरुजी यांनी आपण साहित्य अकादमीची सर्व पुस्तके वाचली आहेत. आता वयोमानानुसार वाचता येत नाही परंतु इतरांकडून पुस्तके वाचून घेण्याची ओढ मात्र कायमच आहे असे म्हटले.
याप्रसंगी बोलताना प्रा. गणेश मोहिते म्हणाले की, रा. रं. बोराडे यांची पिढी ही वाचणे आणि लिहिणे यासाठी जगणारी पिढी होती. रा. रं. बोराडे गुरुजी यांनी कृषिकेंद्रीत व्यवस्थेतील पालापाचोळा झालेल्या माणसांचे लिखाण केले आहे. या माणसांची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. १९७२चा दुष्काळ समजून घ्यावयाचा असेल तर आपल्याला बोराडे गुरुजींच्या कथा, कादंबऱ्या वाचाव्या लागतील असे त्यांनी म्हटले. शंकर वाडेवाले यांनी म्हटले की, रा. रं. बोराडे गुरुजी यांनी साहित्यक्षेत्रात नवोदित-प्रस्थापित किंवा शहरी-ग्रामीण असा दुजाभाव केला नाही. त्यांना ग्रामीण भागाविषयी अधिक ओढ आहे हे त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधून दिसून येते. ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अवलोकन त्यांच्या साहित्यातून दिसून येते असे त्यांनी म्हटले.
अध्यक्षीय भाषणात बाबा भांड यांनी म्हटले की अत्यंत अडचणीच्या काळातही रा. रं. बोराडे हे लेखक आणि प्रकाशकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आज ते थकलेले असलेले तरीही वाचन आणि लेखनाविषयी आंतरिक तळमळ आहे. साहित्य आणि पुस्तकांविषयीचे त्यांचे हे प्रेम येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. यावेळी सौ. सुलभाताई बोराडे, प्रेरणा दळवी, आशाताई भांड, विजयकुमार चित्तरवाड, प्रशांत गौतम, उत्तम बावस्कर, विनोद सिनकर, सविता करंजकर, आशा खरतडे डांगे यांची उपस्थिती होती.