Protest for Shivaji statue : हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरती माघार
अन्यथा 21 पासून पुन्हा आमरण उपोषण, 22 ला ‘गाव बंद’चा इशारा
हिमायतनगर,अनिल मादसवार | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीवरून हिमायतनगरात आंदोलन चांगलेच पेटले असून, प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाच दिवस चाललेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर तात्पुरती माघार घेतली असली, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास 21 एप्रिलपासून पुन्हा आमरण उपोषण छेडण्याचा आणि 22 एप्रिल रोजी संपूर्ण ‘गाव बंद’ करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष माधव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 31 मार्चपासून सुरू असलेले उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत होते. शहरातील वातावरण चिघळत असताना अखेर पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करावी लागली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपंचायतीने पुतळ्यासाठी पाच जागांचे लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.

दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेनेही आक्रमक भूमिका घेत आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला. संघटनेचे विधानसभा अध्यक्ष दत्ता देशमुख यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत ‘हिमायतनगर बंद’ची हाक दिल्याने परिस्थिती आणखी तापली होती.



पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हाके यांच्या उपस्थितीत हिमायतनगर पोलीस ठाण्यात नगरपंचायतीनेही परिस्थितीची गंभीर दखल घेत उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले असून, 4 एप्रिल रोजी शांतता समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. पुढील निर्णायक बैठक 9 एप्रिल रोजी होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मात्र, प्रशासनाकडून ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, “आता आर-पारची लढाई होणार!” 21 पासून उपोषण आणि 22 रोजी ‘गाव बंद’च्या हाकेमुळे प्रशासनासमोर मोठे संकट उभे ठाकले असून, हिमायतनगरातील परिस्थिती कधीही चिघळू शकते.



