नांदेड| अ.भा. काँग्रेस कमिटी नवी दिल्ली हायकमांडने काल रात्री उशिरा महाराष्ट्र काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि कांही शहरी व ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती घोषित केली आहे. त्यात उपाध्यक्षपदी प्रा.यशपाल भिंगे यांना नियुक्त केले तर सरचिटणीस पदी श्रीमती रेखा दत्तात्रय चव्हाण पाटील, डॉ दिनेश निखाते, सुरेंद्र घोडजकर आणि डॉ श्रावण रॅपनवाड यांच्या नावाची घोषणा केली.उत्तर जिल्हाध्यक्ष रिक्त पदावर राजेश पावडे यांना स्थानापन्न करण्यात आले आहे.


ब-याच वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वगळता इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या प्रलंबित होत्या.त्या कालच्या आल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी घोषणेमुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.या घोषणेत वरिष्ठ उपाध्यक्ष -१६, उपाध्यक्ष -३८, वरिष्ठ प्रवक्ता-५,जनरल सेक्रेटरी -१०८, सेक्रेटरी -९५, कार्यकारी समिती सदस्य -८७ तर राजकीय व्यवहार समिती महाराष्ट्र यामध्ये ३५ राज्यस्तरीय काँग्रेस नेते मंडळी असून समितीचे प्रभारी श्री रमेश चेन्नीथला नियुक्त केले गेले आहेत.सदर काँग्रेस प्रदेश महाराष्ट्र पदाधिकारी अ.भा. काँग्रेस कमिटी चे जनरल सेक्रेटरी खा.के.सी.वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.


नांदेड येथे उत्साह
नांदेड उत्तरचे अध्यक्ष पद श्री बी. आर.कदम भाजपात गेल्यापासून रिक्त होते. मध्यंतरी मागील मार्चमध्ये राजेश पवार यांची उत्तर जिल्हा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश कमिटीने नियुक्ती केली होती. पण लगेच वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील ५ पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आल्याने आणि स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मर्जीतील राजेश पावडे यांची उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने सुर्योदयापासून उत्साह संचारला आहे. आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचा फायदा होईल असे बोलले जात आहे.


नुकतेच काँग्रेसवासी झालेले २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत असलेले प्रा.यशपाल भिंगे यांना अग्रस्थानी नियुक्ती देण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाला आहे.


