नांदेड| नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने केली असून रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती उत्खननावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता पोलिस ठाणे मुदखेड हद्दीतील माळाकोठा परिसरात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचे दोन डंपर, एक JCB मशीन, एक जनरेटर आणि रेतीने भरलेले डंपर असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे १ कोटी ४ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.



या प्रकरणी पोलिस ठाणे मुदखेड येथे गुन्हा क्रमांक ३९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी केलेल्या पाहणीत माळाकोठा परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा करून साठवणूक व वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप घारकोसे, पौफेलसिंग जिकलवाड, गणेश भोसले आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी अवैध व्यवसायाची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ९१ ५०५८ १०० १०० या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

