नांदेड| येत्या मंगळवारी 20 तारखेला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी आणि विधानसभेसाठी मतदान होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदानासाठी अनेक प्रलोभने दिली जात आहेत. कोणत्याही भूलथापांना अथवा आमिषांना बळी न पडता भारतीय संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा वापर करावा.
हजार पाचशेला मत विकण्यापेक्षा ते दान करायचे असते असा सल्ला येथील साहित्यिक मारोती कदम यांनी 89 व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात दिला. ते कार्तिक पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी जंबुद्विप बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष बबन सावंत, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे- वैद्य, काव्य पौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, संयोजक निरंजन तपासकर, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर आदींची उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील तरोडा बु. परिसरातील प्रफुल्ल कॉलनीच्या जंबुद्विप बुद्ध विहारात 89 व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक निरंजन तपासकर व अनुराधा तपासकर यांच्यासह मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप व पुष्प पूजन करून अभिवादन केले. सामुहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करुन मान्यवरांच्या सत्कारानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात बुद्ध भीम विचारांवर आधारित कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यात ज्येष्ठ कवी थोरात बंधू, प्रल्हाद घोरबांड, गझलकार चंद्रकांत कदम, विद्रोही कवी राहुल जोंधळे, मारोती कदम, प्रज्ञाधर ढवळे, पांडुरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे, निरंजन तपासकर, रणजित गोणारकर, रुपाली वागरे वैद्य यांनी सहभाग नोंदविला. या कवींनी आपल्या कवितांमधून मतदान जनजागृतीही केली.
दरम्यान आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा जंबुद्विप बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष बबन सावंत यांनी सप्तरंगी साहित्य मंडळास एक हजार रुपये दान दिले. यावेळी साहित्य मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. ही भेट नागोराव डोंगरे यांनी स्विकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक निरंजन तपासकर यांनी केले. काव्यपौर्णिमेचे सुरेख सूत्रसंचालन रणजित गोणारकर व अनुरत्न वाघमारे यांनी केले. आभार निरंजन तपासकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मस्के, लोणे, खिराडे, कांबळे, वाघमारे, कदम, थोरात यांच्यासह प्रफुल्ल कॉलनीतील ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला प्रफुल्ल कॉलनी व परिसरातील कवी कवयित्रींसह बौद्ध उपासक- उपासिका बालक- बालिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.