नांदेड| ओबीसी आणि मराठा ताट वेगळे आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका आहे. जर आमच्या हातात सत्ता आली तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वेगळा मार्ग आम्ही काढू. मात्र मराठा व ओबीसी समाजातील वादाचा फायदा सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी घेत आहेत. महाराष्ट्राचे मणिपूर करू नका, हे शरद पवार यांचे वक्तव्य आग लावणारे आहे. तसेच आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जावे, जागा वाढवून घ्या,असे ठाकरे यांचे वक्तव्य चिथावणीखोर आहे. असा आरोप एड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आरक्षण बचाव यात्रेच्या मंचावरून बोलत होते. शुक्रवारी नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर एड प्रकाश आंबेडकर यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं.
जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथून यात्रेला शुक्रवारी प्रारंभ झाला. माळेगाव येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र खंडोबाचे दर्शन घेऊन ॲड.आंबेडकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे ओबीसी समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले. जेसबीने फुलांची उधळण करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्यागे आमची काहीही मागणी नाही. जरांगे पाटील यांनी जी मागणी केली, त्यामुळे गावागावात दोन गट तट निर्माण झाले आहेत. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात मतभेद निर्माण झाले आहेत.
मराठा समाज म्हणातो आम्ही ओबीसींना मतदान करणार नाही. तर ओबीसी समाज म्हणतो आम्ही मराठा समाजाला मतदान करणार नाही. या वादाचा काही जण राजकीय फायदा उचलत आहेत. राजकीय भांडणाला सामजिक वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. त्यामुळे आम्ही संविधान बचाव यात्रेच्या माध्यमातून दोन्ही समजला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वेगळा मार्ग आम्ही काढू.. आरक्षण कोण..? देऊ शकतो कश्या प्रकारे देऊ शकतो.. याची जनजागृती आम्ही करत आहोत. गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसवावे. ओबीसी सोबत वंचितला सत्ता द्यावी. असे केल्यास आम्ही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग काढू असेही एड प्रकाश आंबेडकर म्हणाले.