नांदेड| माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत कृषिदिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत साजरा करण्यात येणार आहे.
कृषिदिनाच्या दिवशी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा वृक्ष देवून गौरव करण्यात येणार आहे. या कायर्क्रमात शेतकऱ्यांना किटनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, गुलाबी बोंडअळी नियंत्रण, नॅनो फर्टीलायझरचा वापर, एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन विविध पिके लागवड तंत्रज्ञान, एकात्मीक खत व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी किटकनाशक फवारणी करताना वापरावयाची सेफ्टीकिटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. तालुकास्तरावरु पंचायत समिती व कृषि विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्यत्वाने शेतकऱ्यांच्या शेतावर वृक्ष लागवड, विहिरीचे जलपुजन, विहीर पुर्नभरण, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे कृषि विकास अधिकारी विजय बेत्तीवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे निर्देश
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2024 रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत.
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 28 एप्रिल 2006 दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जि.प. समाज कल्याण अधिकारी, उच्च शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी निरंतर जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा क्रीडाधिकारी, प्राचार्य तंत्रशिक्षण, प्राचार्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी योग्य ती कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.