Wednesday, May 13

suicide ; सावकारी कर्जामुळे एकाची चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बिलोली, गोविंद मुंडकर l घराचे बांधकाम करण्यासाठी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाखाली दबलेल्या बिलोली तालुक्यातील केसराळी येथील एका इसमाने दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील केसराळी येथील साईनाथ भुमा मुद्दलवार वय 38 यांचे गावातच घराचे बांधकाम सुरू आहे. साईनाथ हा शेती आणि शेतमजुरी करत असे. शेतीवर गुजारा होत नसल्यामुळे पंक्चर चे दुकानही टाकले होते. उदरनिर्वाहासाठी गावातच हंगामी टेन्ट हाऊस चा व्यवसाय करायचे. सध्या साईनाथ यांच्या घराचे बांधकाम सुरू होते.बांधकामासाठी साईनाथ यांनी खाजगी सावकारी कर्ज घेतल्याचे सांगण्यात आले.

खाजगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून साईनाथ भुमा मुद्दलवार यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नारायण सिंग ठाकूर यांच्या शेता जवळील नाल्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती केसराळी येथील माजी सरपंच दत्ता महाडे यांनी दिली. साईनाथ यांना एक मुलगी (वय 14 ) आणि एक मुलगा ( वय 12 )आहे.सदर घटने बाबत बिलोली पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात येत आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केसराळी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आली.

या घटनेचे बिलोली नायगाव धर्माबाद आणि देगलूर तालुक्यातील विविध ठिकाणी तीव्र पडसाद उमटले आणि आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी प्रबोधनाची गरज असल्याचे सांगून सेवाभावी संस्थांना विनंती केली तर शासनाने आर्थिक मदती बरोबरच रचनात्मक कार्य उभारावे असेही सुचविले.

वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकरणी प्रभावी पाऊल उचलण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब मोरे यांनी शासन आणि प्रशासनाला ठणकावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!