हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे गुरुवारी सकाळी मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


दिनांक २७ बुधवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरात बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चना, महाप्रसादाचा भोग अर्पण करत आगामी येणारा काळ सुख समृद्धी, निरोगी व निरामय ठेऊन देशाची शांतता अबाधित ठेवण्याचे साकडे अनेकांनी गणपती बाप्पाना घातले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी एक दिवस व दीड दिवसांच्या गणरायाला भाविक भक्तांनी पांडवकालीन श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. येथील घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी बालगोपाळांसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाला साकडे घालत विसर्जन करून पुढच्या वर्षी लवकर येण्याचा निरोप देण्यात आला. गणेशभक्तांच्या डोळ्यांत बाप्पाला निरोप देताना ओलावा होता, तर पुढील वर्षी बाप्पाचे स्वागत करण्याचा संकल्प त्यांनी केला. येथील विसर्जन घाट तलावाच्या ठिकाणी असलेल्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिरात गणेशोत्सवाच्या काळात दररोज भव्य महाप्रसादाचे आयोज करण्यात आले असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



