देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर येथील नव गणेश मंडळाच्या वतीने नऊ दिवस भाविक भक्तीभावाने आरती, पूजा-अर्चा, विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवसाचा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.


नऊ दिवस गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. सकाळ-संध्याकाळ आरती, लहान बाल गोपाळांसाठी खुर्ची रेस, चमचा-गोटी स्पर्धा, तसेच महिलांसाठी भक्ती संगीतावर ढोल ताशाच्या तालावर नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.



आज ढोल-ताशांच्या गजरात, जयजयकाराच्या घोषणा देत आणि भक्तीभावाने भरलेल्या वातावरणात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस निरीक्षक मारोती मुढे, पोलीस उपनिरीक्षक फड, महिला पोलीस अधिकारी व पोलीस होमगार्ड यांचा विशेष बंदोबस्त तैनात होता.






