नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज (मुरुम) उत्खनन व धोकादायक वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 19 हायवा वाहने जप्त करण्यात आली असून 38 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या हायवा व मुरुमाचा एकूण मुद्देमाल 11 कोटी 02 लक्ष 95,000/- रुपये इतका आहे.


ही कारवाई पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, गुन्हा क्रमांक 08/2026 अंतर्गत करण्यात आली असून आरोपींविरोधात कलम 303(2), 125, 3(5) बीएनएस, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(7)(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9, 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाकाबंदी दरम्यान कारवाई
दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास, असर्जन नाका ते भगतसिंग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर (कोठा, नांदेड) नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू केली. यावेळी रॉयल्टी शिवाय मुरुम वाहतूक करणारे, क्षमतेपेक्षा अधिक मुरुम भरलेले तसेच वाहनाच्या बॉडीच्या वर शिग लावून अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक करणारे 19 हायवा रंगेहात पकडण्यात आले.



या वाहनांमुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत होता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व हायवा व त्यातील मुरुम जप्त केला. यात अशोक लेलँड कंपनीचे 10 हायवा, भारत बेंझ कंपनीचे 5 हायवा, टाटा कंपनीचे 4 हायवा चा समावेश असून, प्रत्येक हायवाची अंदाजे किंमत 58 लाख रुपये आहे. एकूण हायवाची किंमत 11 कोटी 2 लाख रुपये आहे. तसेच प्रत्येकी अंदाजे 10 ब्रास मुरुम (500 रुपये प्रति ब्रास) असा एकूण 95,000 रुपयांचा मुरुम जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई मा. श्री. अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड श्रीमती अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, प्रशांत शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रेखा काळे, पोउपनि व्यंकट कुसमे तसेच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
कार्यवाहीनंतर वाहनधारकांना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “क्षमतेपेक्षा अधिक माल भरून, रिफ्लेक्टरविना व नियमबाह्य पद्धतीने वाहतूक केल्यास वाहन जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही गौण खनिजाची चोरी करू नये.” या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.
