नवीन नांदेड| जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचे, जनावरांचे, तसेच गृहउपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण (सिडको) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.


त्यांनी आपला एक महिन्याचा पगार आपत्ती व्यवस्थापन फंडात जमा करून शेतकरी पुनर्वसनासाठी देण्याची विनंती पोलीस अधीक्षक नांदेड यांना केली आहे. विशेष म्हणजे चिंचोलकर हे स्वःत शेतकरी कुटुंबातील असून, त्यांचे मूळ गाव संगम चिंचोली (तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ) हे हदगाव सीमेवरती पेनगंगा नदीचे पलीकडे असून, हे देखील पुरग्रस्त बाधित झाले आहे. हदगाव येथे कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून मदतीचा आदर्श घालून दिला होता.


चिंचोलकर यांनी म्हटले आहे की, “पोलीस प्रशासनात काम करत असलो तरी शेतकऱ्यांच्या संकटात आम्हीही त्यांच्यासोबत उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.” नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवलेला हा सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरत आहे.




