नांदेड | भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय यश संपादन करत नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड विभागाने ₹11.06 कोटी इतका महसूल मिळवला असून, ही कामगिरी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20.23 टक्क्यांनी अधिक आहे. निर्धारित उद्दिष्ट ओलांड करणारा नांदेड विभाग हा एकमेव विभाग ठरला आहे.


तिकीटविरहित व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी विभागभर सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि कडक तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. एका वर्षात संपूर्ण स्थानके व गाड्यांचा समावेश असलेल्या 114 ‘फोर्ट्रेस चेक’, मोठ्या पथकांसह 17 ‘मॅसिव्ह चेक’, कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी 7 ‘मॅजिस्ट्रेट चेक’, तसेच संवेदनशील ठिकाणी 11 ‘स्पॉट चेक’ घेण्यात आले. याशिवाय, अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी दरमहा सरासरी ‘अॅम्बुश चेक’ व बस छापे नियमितपणे राबविण्यात आले.

या मोहिमांची परिणामकारकता विक्रमी कारवाईतून दिसून येते. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी एका दिवसात सर्वाधिक 1,581 प्रकरणे उघडकीस आणत ₹10,90,139 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तर ऑक्टोबर २०२५ हा महिना सर्वाधिक कार्यक्षम ठरला असून, या महिन्यात 26,266 प्रकरणे नोंदवून ₹1,55,21,835 इतकी विक्रमी वसुली करण्यात आली.


या यशस्वी कारवायांसाठी 33 तिकीट तपासणी पथक कर्मचारी, 17 विभागीय कार्यालयातील कर्मचारी व 171 यात्री सुविधा कर्मचारी (कमर्शियल अमेनिटीज स्टाफ) यांनी समन्वयाने काम केले. तसेच रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तिकीट तपासणी मोहिमांचे मार्गदर्शन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी केले. तर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. बी. रितेश आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. शैलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आल्या.
नांदेड रेल्वे विभाग तिकीटविरहित प्रवासाविरोधात भविष्यातही कठोर भूमिका कायम ठेवणार असून, महसूल संरक्षण, प्रवासी शिस्त आणि न्याय्य प्रवास व्यवस्था यासाठी आपली कटिबद्धता दृढ ठेवणार असल्याचे जनसंपर्क कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

