भोकर| भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा हक्क-अधिकार प्रदान केला आहे. निसंदेह ‘माझे मत माझा अधिकार’ आहे तो लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी बजावणारच असा संकल्प शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील नवमतदार विद्यार्थिनींनकडून कऱण्यात आला आहे.
८५- भोकर विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रम घेऊन, नवमतदार मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, स्वीप कक्ष प्रमुख सुमन गोणारकर, वस्तीगृह अधिक्षिका सौ सुमित्रा साळुंके,आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगितले.
यास नव मतदार विद्यार्थिनींनी मोठा प्रतिसाद देत आम्ही मतदान करणारच व जवळच्या नातेवाईकांनाही मतदान करण्यास भाग पाडणार असा संकल्प केला. दरम्यान वस्तीगृह अधिक्षिका सौ सुमित्रा साळुंके यांनी वस्तीगृहात रांगोळी , चित्रकला, पालकांना मतदानासाठी पत्र लेखन, वक्तृत्व स्पर्धा घेऊन मतदान जनजागृती कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला..