हिमायतनगर (अनिल मादसवार) कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांच्या मोठ्या गर्दीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याच्या पोटा बु गावातील अल्पभूधारक शेतकरी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. गेल्या विस वर्षांपासून अखंड पायी वारी करणाऱ्या या वारकरी दांपत्याला यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सपत्नीक शासकीय पूजेचा बहुमान मिळाला.


हिमायतनगर तालुक्यातील वारकरी संप्रदायामध्ये हा पहिलाच शासकीय पूजेचा मान असल्याने या दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भक्तीभावाने दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारी करणाऱ्या वालेगावकर दांपत्याने सांगितले, “गेल्या विस वर्षांपासून आम्ही विठ्ठल चरणी जात आहोत. आज कार्तिकी एकादशीला आम्हाला ‘मानाचा वारकरी’ म्हणून पुजेचा मान मिळाला. हे आमच्यासाठी विठ्ठलाचे आशीर्वाद आहे.” विशेष म्हणजे या शासकीय पूजेचा मान मिळाल्या बरोबरच राज्य सरकारतर्फे या दांपत्याला एका वर्षासाठी मोफत बस प्रवास पास देण्यात आला आहे.



ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर यांनी या वारकरी दांपत्याचे कौतुक करत म्हटले की, “हिमायतनगर तालुक्यातील वारकरी परंपरेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विठ्ठलभक्ती, संयम आणि सातत्याचे हे प्रतीक आहे.” पोटा बु गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात या वारकरी दांपत्याच्या मानाच्या पूजेबद्दल अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




