हदगाव/हिमायतनगर/ नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कांडली (बु.) येथे एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून करून प्रेत भोकर तालुक्यातील सिंगारवाडी शिवारातील विहिरीत टाकण्यात आले. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


मृत तरुणाचे नाव नकुल संजय पावडे (१७, रा. कांडली बु.) असे आहे. तो संभाजीनगर येथे शिक्षण घेत होता व दिवाळीनिमित्त गावाला आला होता. मात्र, २६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून तो बेपत्ता होता. मुलगा घरी परतला नाही म्हणून वडील संजय शिवाजी पावडे यांनी नातेवाईकांसह शोध घेतला. तो न सापडल्याने २७ ऑक्टोबर रोजी तामसा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.


पोलिसांनी तपास सुरू करताच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संशयितांवर लक्ष केंद्रित केले. तपासाअंती पोलिसांनी गणेश संभाजी दारेवाड (३९) आणि विशाल गणेश दारेवाड (१९), दोघेही राहणार कांडली (बु.), या बाप-लेकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नकुलचा खून करून त्याचे प्रेत पोत्यात बांधून विहिरीत टाकल्याची कबुली दिली.


तामसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर ३ वाजता विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस तपासात उघड झाले की, दोन्ही आरोपींच्या नातलग मुलीसोबत मृतकाचे प्रेमसंबंध होते. तिच्या लग्नानंतरही तो संपर्क साधत असल्याने रागातून त्याचा खून करण्यात आला.

या प्रकरणी अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बालाजी नरोटे तपास करीत आहेत. अटक केलेल्या दोघा आरोपींना भोकर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


