नांदेड, अनिल मादसवार| राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या अपघातप्रवण ठिकाणांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे जीवितहानी होत आहे. या ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांचा धोका कमी करण्याच्या मागणीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट (MP Ashokrao Chavan met Nitin Gadkari) घेतली. संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत सदर महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांना आणि वाहनचालकांना अनेक ठिकाणी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने, भरधाव अवजड आणि चारचाकी वाहनांमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.


दूध डेअरी चौक ते धनेगाव पाटी दरम्यानच्या उड्डाण पुलाच्या मुद्द्यावर याप्रसंगी विस्तृत चर्चा झाली. धनेगाव येथील नागरिकांचे या उड्डाणपूलाबाबत आक्षेप असल्याचे मी त्यांना सांगितले. भराव टाकून उड्डाण पूल झाल्यास नागरिकांना एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यास अडचणी येतील. त्यामुळे याठिकाणी सिंगर पियर उड्डाण पुलाचा पर्याय स्वीकारावा, जेणेकरून नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग मिळेल, अशी आग्रही मागणी ना. गडकरींकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी भराव टाकून उड्डाण पूल बांधण्याऐवजी सिंगल पियर उड्डाण पूल बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती दिली. या पुलाबाबत अहवाल मागवून निर्णय घेण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.



पिंपळगाव महादेव येथेही उड्डाण पूल बांधण्याची मागणी मी केली. या मागणीला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विस्तृत व्यवहार्यता अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, पिंपळगाव महादेव जंक्शन, देगाव, विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय, खडकूत जंक्शन, दाभड जंक्शन, अर्धापूर बायपास-पांगरी रस्ता जंक्शन आणि शेनी रस्ता जंक्शन यासारख्या ठिकाणांबाबतही चर्चा झाली. या ठिकाणांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून आवश्यकतेनुसार सर्व्हिस रोड, पादचारी पूल किंवा सिंगल पिअर उड्डाणपूल सारख्या पर्यायांचा विचार करण्याची मागणी मी त्यांच्याकडे केली. ना. नितीनजी गडकरी यांनी याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.




