
नांदेड (प्रतिनिधी) शहरात ७० तासांत पाच खून झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच सोमवारी पहाटे आणखी एक थरारक घटना घडली. श्रीनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकर यांची ७ ते ८ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ५.३० वाजता सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना अचानक टोळक्याने त्यांना गाठले. हल्लेखोरांनी कटर, चाकू आणि अन्य धारदार शस्त्रांनी सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे. बहिणीचे लग्न मोडल्याच्या रागातून हा कट रचल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, संबंधित आरोपीने तुरुंगात असतानाच साथीदारांच्या माध्यमातून खुनाची योजना आखल्याची माहिती पुढे येत आहे. सोनू कल्याणकर यांच्यावर यापूर्वीही गोळीबार झाला होता, मात्र ते त्यातून बचावले होते. त्यानंतर दोन्ही गटांतील वाद अधिक तीव्र झाला आणि अखेर या वैमनस्याचे रूपांतर हत्येत झाले.


घटनेनंतर श्रीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली. सकाळच्या वेळी विद्यार्थी आणि नागरिकांच्या समोरच ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच चार आरोपींना ताब्यात घेतले. यातील काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला असून तो जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये पुन्हा एकदा गँगवॉरचे सावट गडद झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांसमोर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.



