नांदेड, विशेष प्रतिनिधी | मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पाणबुडी) विद्युत मोटारींची चोरी करून त्यांची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीला मनाठा पोलिसांनी रंगेहात पकडत ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणी पोलीस ठाणे मनाठा येथे गुन्हा क्रमांक 11/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दि. 14 जानेवारी 2026 रोजी पहाटे 12.30 वाजता पिंपरखेड ते बामणी रस्त्यावर घडल्याची नोंद आहे.

गोपनीय माहितीतून कारवाई
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार चोरीच्या मालमत्ते विरोधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कारवाई सुरू असताना, मनाठा पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी पिंपरखेड–बामणी रस्त्यावरून काही इसम चोरीच्या पानबुडी विद्युत मोटारी लोडिंग APE रिक्षामधून विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.


आणि मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून पाच पानबुडी विद्युत मोटारी, पिवळ्या रंगाची APE कंपनीची लोडिंग रिक्षा (MH-26/BD-3066), लाल रंगाची Hero Honda Passion मोटारसायकल (MH-20/BF-7234)
असा एकूण ₹4,59,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अनिकेत बबनराव अवादार (20), रा. करमोडी, सुरज निलेवार, रा. करमोडी, शिवदास केशव पतंगे (24), रा. पिंपरखेड
पवन शिवाजी वाकोडे (30), रा. पिंपरखेड, प्रितम सुभाष पवार (23), रा. बरडशेवाळा, ता. हदगाव, समीर मन्नान अब्दुल (25), रा. वारंगा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सपोउपनि दत्तात्रय गिरी, पोहेको कृष्णा यादव, पोको शामराव खनपटे व पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. उत्कृष्ट व तत्पर कामगिरी बद्दल मनाठा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक व अभिनंदन केले.

