कंधार, सचीन मोरे| महावितरणच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा आणखी एक बळी कंधार तालुक्यात गेला असून, लोंबकळत्या 33 के.व्ही. उच्चदाब विद्युत तारेचा धक्का लागून गयाबाई विठ्ठल माडगे (रा. स्वप्नभूमीनगर, कंधार) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 27 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे कंधार तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.


चार महिने तसाच पडून होता खांब!
शेकापूर शिवारात महावितरणचा 33 के.व्ही.चा विद्युत खांब ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे कोसळला होता. परिणामी विद्युत तार जमिनीपासून अवघ्या पाच फूट उंचीवर लोंबकळत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, चार महिने उलटूनही महावितरणने ना खांब उभारला, ना तार उंच केली!

चारा आणायला गेलेली महिला मृत्यूच्या जाळ्यात
गयाबाई माडगे या गाई-म्हशीसाठी चारा आणण्यासाठी शेकापूर शिवारात गेल्या होत्या. चारा कापून डोक्यावर भारा घेऊन परत येताना, लोंबकळणारी विद्युत तार न दिसल्याने त्यांचा उच्चदाब विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला. मृत महिलेची उंची साडे पाच फूट असल्याने हा अपघात टाळणे अशक्य होते.


तक्रारी करूनही अधिकारी ढिम्म!
स्थानिक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी करूनही महावितरणच्या उपअभियंता, अभियंता व कर्मचाऱ्यांनी डोळेझाक केली. या हलगर्जीपणाचा शेवट अखेर एका गरीब कुटुंबाच्या आयुष्यावर बेतला.

“हा अपघात नाही, सरकारी निष्काळजीपणामुळे झालेला खून!”
मृत महिलेचे पती विठ्ठल माडगे यांनी पोलिस ठाणे कंधार येथे तक्रार अर्ज दाखल करून महावितरणच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट कलम 302 (मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणातून घडलेला खून आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासन जागे होणार की आणखी बळी जाणार?
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे याआधीही अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. तरीही जबाबदारी निश्चित न झाल्याने असे मृत्यू सुरूच आहेत. कंधारातील ही घटना प्रशासनासाठी इशारा आहे की अजून एका मृत्यूनंतरच कारवाई होणार? या प्रकरणात पोलिस काय भूमिका घेतात, दोषींवर गुन्हा दाखल होतो की नेहमीप्रमाणे फाईल धूळ खात पडते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

