Friday, May 15

‘Saturday’ is my favourite…! | ‘शनिवार’ माझ्या आवडीचा…! -NNL

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविणे बाबतचे शासन परिपत्रक मार्चमध्ये येऊन धडकले आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले. त्याला कारणही तसेच मजेशीर व गंमतीदार आहे असेच म्हणावे लागेल. या परिपत्रकानुसार दर शनिवारी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये प्रचलित वर्गांऐवजी दप्तराविना शाळा भरणार व विद्यार्थ्यांचा शनिवार हा वेगळ्या कार्यपद्धतीद्वारे आनंददायी व मनोरंजक स्वरूपाचा होणार आहे.

सध्याच्या काळात मुलांच्या हसण्या- खेळण्याच्या- बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना ताण, तणाव, उदासीनता व नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे; यावर उपाय म्हणून शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवत होती आणि 14 मार्च 2024 रोजी निघालेल्या शासन परिपत्रकामुळे याची जणू परिपूर्तीच झाली. या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 15 जून 2024 पासून दर शनिवारी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली व अल्पावधीतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या तोंडून ‘शनिवार माझ्या आवडीचा…’ हे वाक्य सहजपणे ऐकायला येऊ लागले.

आनंददायी शनिवार या अंतर्गत दर शनिवारी शाळेत नाविन्यपूर्ण कृती व मनोरंजनात्मक खेळ सुरू झाले. यामुळे शाळेतील वातावरण आनंदी व हलके फुलके झाले याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली तसेच त्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढून नैराश्येवर मात करण्याची क्षमता नकळतपणे वाढीस लागण्यास सुरुवात झाली आणि शासनाचे परिपत्रक काढण्यामागील हेतू आपोआप साध्य होत असताना दिसत आहे.

दप्तराविना शाळा व त्याला मनोरंजनात्मक खेळ, कृती व उपक्रम यांची जोड असल्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण होऊन शिक्षकांविषयी असलेली मनातली भीती कमी होत आहे कारण, शिक्षकही स्वतःला विसरुन मुलांमध्ये मुल होऊन शनिवारच्या उपक्रमात आनंदाने सहभागी होत आहेत याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर व त्यांच्या मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यावर होत आहे यामुळे ’शनिवार’ हा मुलांना मनापासून आवडणारा ’फन्नीवार’ होत असल्याचे बोलके व आशादायी चित्र शाळेतून पहावयास मिळत आहे.

आनंददायी शनिवार या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुण आदी गुणांचा विकास होऊन विद्यार्थी शाळेत आनंदाने रममाण होतील व यातून विद्यार्थ्यांच्या गळतीचे व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल यात तिळमात्र शंका नाही.

– ज्ञानेश्वर तु. गायकवाड (स.शि.) जि.प.प्रा.शा. इंदिरानगर शेलगाव ता. अर्धापूर, जि. नांदेड, मो.नं. 9975460961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!