हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील धानोरा ज. शिवारात बिबट्याने हल्ला करून एका रोहीची शिकार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील विविध शेतशिवारांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. याच दरम्यान एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलेल्या घटनेची धग ओसरत नाही तोच बिबट्याने रोहीचा फडशा पाडल्याने दहशत अधिकच वाढली आहे.


धानोरा, बोरगडी, सिबदरा, कारला, वारंगटाकळी, मगरूळ, खैरगाव, वडगाव तसेच हिमायतनगर परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज एखाद्या गावात बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धानोरा शिवाराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रोहीच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचा दफनविधी करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.


दरम्यान, सतत बिबट्याचे हल्ले होत असताना वनविभागाचा पाठलाग करूनही अद्याप ठोस उपाययोजना न दिसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करून सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे.


