नांदेड, अनिल मादसवार| राज्यभरात वारंवार बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडत असताना, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या घटनेनंतर परिसरातील गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


ऑटोचालकानं टिपला बिबट्या!
मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑटो चालक माता रत्नेश्वरी मंदिरातून खाली येत असताना त्याला रस्त्यावर बिबट्या दिसला. ऑटो चालकानं तत्काळ त्या क्षणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला आणि ही माहिती वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी केशव वाबळे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि प्रथमदर्शनी बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी केली.


वन विभागाची खातरजमा:
वडेपुरी शिवारात बिबट्याच्या हालचालींची खात्री करण्यासाठी वन विभागाचं विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं. माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे.



गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट:
सदर घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अतुल सेन या स्थानिक नागरिकाने बिबट्याला करणे हॉटेलजवळ प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याचे दोन व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. माहिती मिळताच वन विभागाने आणि पोलीस प्रशासनाने आजूबाजूच्या सर्व गावांतील पोलीस पाटलांना सूचना दिल्या. गावोगावी दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस आणि वन विभागाचा संयुक्त तपास:
सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितलं की, “आतापर्यंत कोणतंही नुकसान झालेलं नाही, मात्र परिसरात भीतीचं वातावरण आहे.” सध्या वन विभाग आणि पोलिसांचं संयुक्त पथक या भागात गस्त वाढवत असून, गावकऱ्यांना रात्री उशिरा बाहेर न पडण्याचं आणि एकटं फिरू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात बिबट्यांची संख्या ३१:
नांदेड जिल्ह्यात बिबट्यांचा वावर ही नवी बाब नाही. वन विभागाने बौद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर १२ आणि १३ मे रोजी केलेल्या विशेष सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण ३१ बिबट्या असल्याचं स्पष्ट झालं होतं.
वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या: माहूर वनपरिक्षेत्र : ८ बिबट्या (सर्वाधिक), किनवट : २ बिबट्या, बोधडी : ४ बिबट्या, अप्पाराव पेठ : ३ बिबट्या, इस्लापूर : २ बिबट्या, हिमायतनगर : २ बिबट्या, हदगाव : १ बिबट्या, भोकर : ४ बिबट्या, नांदेड वनपरिक्षेत्र : ५ बिबट्या
सुरक्षिततेसाठी आवाहन: वन विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावं, रात्रीच्या वेळी शेतात एकटं न जाणं आणि मुलांना घराबाहेर न सोडणं गरजेचं आहे. तसेच बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवावं.


