हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर असलेल्या मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर नवीन शैक्षणिक सत्र सुरु होऊन अद्याप एकही शिक्षक आला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप लावून शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला आहे. जोपर्यंत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही असा पवित्र शिक्षणप्रेमी पालकांनी घेतला आहे.
हिमायतनगर तालुका हा मागास तालुका असून, आजही शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. शिक्षणाचा पाया असलेल्या कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरु होण्यापूर्वी महिन्यापासून शिक्षक देऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा अशी मागणी गावातील शिक्षणप्रेमी महिला पुरुष पालक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयाराम रमेश आडे यांनी हिमायतनगर येथील गटशिक्षण कार्यालयाकडे केली. मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले आहे, नवीन शैक्षणिक सत्राची शाळा सुरू झाली असताना अद्याप येथील जिल्हा परिषद शाळेवर एकही शिक्षक आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या ठिकाणी इयत्ता पहिली पासून ते पाचवी पर्यंतची शाळा चालविले जाते. आजघडीला या सहलीत एकुण विद्यार्थी संख्या 80 असून, त्यामध्ये वाढ होण्यांची शक्यता आहे. पुर्वी शाळेवर जे शिक्षक होते त्यांच्या बदल्या झाल्याचे पालकांना कळाले आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे दिनांक 15 जुन 2024 रोजी सुरु झालेली आहे. शाळा सुरु झाल्यानंतर फक्त एक शिक्षक हजर होवुन शाळा बघुन निघुन गेला. त्यानंतर शाळा उघडलेली नाही त्यामुळे आज दिनांक 18.06.2024 रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावांतील पालक व नागरीक शाळेवर उपस्थित झाले व कोणता तरी शिक्षक येईल म्हणुन शाळेवर 11.30 वाजेपर्यंत वाट पाहिली. परंतु शाळेवर एकही शिक्षक हजर झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व शिक्षण प्रेमी पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे
ग्रामीण भातातील शिक्षणाची हि दुरावस्था दूर करून शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्वरीत शाळेवर विद्यार्थी संख्या बघुन शिक्षकांची त्वरीत नेमणुक करुन शाळा पुर्ववृत्त सुरु करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्वरीत शाळेवर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक हजर न झाल्यास आमच्या पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत देण्यांत याव्यात असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जर उद्या दिनांक 19.06.2024 पासुन शाळेवर शिक्षक हजर न झाल्यास आमच्या पाल्यांच्या शैक्षणिक नुकसानीस हिमायतनगर येथील शिक्षण विभाग जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी असा इशाराही कुलूप लावणाऱ्या पालकांनी दिला आहे.