किनवट, परमेश्वर पेशवे। किनवटच्या महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमे अंतर्गत फिरत्या पथकाने 4 व 5 जून अशा दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून रेती मुरूम व दगडाची विनापरवाना वाहतूक करणारे 6 ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.
किनवट तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून तहसील कार्यालयातील गौणखनिज विभागाच्या फिरत्या पथकाने 4 जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी रेती मुरूम व दगडाची विनापरवाना वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टिप्पर पकडले आहेत.तालुक्यातील राजगड येथे दगड भरून वाहतूक करत असलेले 1टिप्पर व 2 ट्रॅक्टर फिरत्या पथकाच्या निदर्शनास आले.त्यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्यामुळे दगड भरून असलेली तीनही वाहने ताब्यात घेऊन किनवट तहसील कार्यालयाच्या आवारात लावली आहेत.
जप्त केलेले दगड राजगड येथील एका गिट्टी क्रेशर मशीनवर जात होते असे पथकातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मारेगाव व भंडारवाडी येथील पैनगंगानदी काठी रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडून इस्लापूर पोलीस ठाण्यात लावले आहेत तर परसरामनाईक तांडा ते उनकेश्वर व जरूर ते कनकी मार्गावर रेती व मुरूमची वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडून मांडवी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. दि 5 जून रोजी पाटोदा येथून रेतीचे 1 ट्रॅक्टर पकडून कारवाई केली आहे.
उपविभागीय अधिकारी मेघना कावली व तहसीलदार शारदा चौन्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सौ तेलंग तलाठी केंद्रे मॅडम,तलाठी गेडाम, तलाठी डुकरे या महिलांच्या फिरत्या पथकासह महसूल सहाय्यक गोविंद पाम्पटवार मंडळ अधिकारी कांबळे, मंडळ अधिकारी पटणे शिंगेवाड, तलाठी विश्वास फड,तलाठी यु आर जाधव, तलाठी बोन्तावार, तलाठी मंगेश बोधे, आदिनाथ डुकरे, मेघश्याम सांगवीकर, गौतम पांढरे, विश्वास फड, अंकुर सकवान, माणीक बोधगिरे, तलाठी सटलावार काळे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.महसूल प्रशासनाच्या या धडक कार्यवाही मुळे गौणखनिजाची विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.