हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यात लवकरच उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या पुढाकारातून ऊस कारखाना उभा राहणार असून, हा निर्णय शेतकरी हिताचा आणि दूरगामी परिणाम करणारा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.


पवना शिवारात ऊस कारखान्यासाठी जागा निश्चित झाल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. पवना गावासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचेही माजी आमदार जवळगावकर यांनी सांगितले.

हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील शेतकऱ्यांनी व्ही. पे. की. उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे यांना ऊस कारखाना उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. या योगदानाबद्दल संबंधित शेतकऱ्यांचा सत्कार कवळे गुरुजी व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.


शनिवारी माजी आमदार जवळगावकर यांनी कवळे गुरुजी यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देत सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की,

“कवळे गुरुजी यांनी हिमायतनगर तालुक्यात ऊस कारखाना उभारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. हा कारखाना उभा करण्यासाठी या भागातील शेतकरी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. कोणत्याही अडचणी येऊ देणार नाहीत. कारखान्याचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करून गतीने पूर्ण झाले पाहिजे.”

ऊस कारखान्यामुळे ऊस उत्पादक क्षेत्रात वाढ होईल, शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण होईल तसेच परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आभारप्रदर्शन करताना मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले की,“हिमायतनगर परिसरातील जमीन सुपीक असून येथे ऊस उत्पादनासाठी मोठी क्षमता आहे. या भागात ऊस कारखाना उभा राहिल्यास ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होईल आणि शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करेल. पवना गावातील शेतकरी व संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा कारखाना उभारण्याचे स्वप्न असून, सर्वांच्या पुढाकाराने ते नक्की पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.”
याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कारही कवळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष शेख रफीकभाई, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, संदीप पाटील कवळे यांच्यासह हदगाव, हिमायतनगर व उमरी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

