नांदेड| शहरातील पत्रकार इंडिया न्यूज या वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार स्वामी यांचे आज दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता अल्प आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ,बहिण,पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.


गेल्या काही महिन्यांपासून स्वामी यांच्या शरिरात रक्त तयार होत नव्हते. त्यांना रक्तविकार झाला होता. काल रात्री त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.


स्व. राजकुमार स्वामी हे मितभाषी होते. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसोबत त्यांचे स्नेहाचे संबंध होते. बुद्ध पहाट या बुद्ध पोर्णिमेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. विशेष म्हणजे उद्या भारतीय स्वातंत्र्य दिनी दि.15 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पुर्व संध्येला मृत्यूने त्यांना कवटाळले.


स्व. राजकुमार स्वामी यांची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार, दि.15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हेवार बिल्डींग, गट्टाणी साऊंड सर्व्हिसच्यावर गणेश नगर, पावडेवाडी नाका रोड, नांदेड येथील त्यांच्या निवासस्थाना पासून निघणार असून गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



