नांदेड। पत्रकार दिलीप शिंदे यांच्या ‘झळा पावसाळा’ या आत्मकथनाचे आज सायंकाळी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
यावेळी निवृत्त विभाग प्रमुख प्रा. सुरेश पुरी, प्रा गणी पटेल , ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. पिपल्स महाविद्यालयाच्या स्व.नरहर कुरुंदकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे. अविरत प्रकाशनचे प्रकाशक डॉ. देवदत्त देशपांडे यांनी ही माहिती दिली.
मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकार दिलीप शिंदे प्रसार माध्यमात कार्यरत आहेत. दै. नांदेड सांज, आकाशवाणी तसेच आधुनिक यूट्यूब माध्यमातून त्यांनी पत्रकारिता केली आहे. सामान्य कुटुंबातून येऊन माध्यमात आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
झळा पावसाळा या आत्मकथनातून त्यांनी पंचवीस वर्षातील गोड कटू अनुभव मांडले आहेत. बोली भाषेतुन कथानकाच्या स्वरूपातील लेखन हे झळा पावसाळा चे वैशिष्ट्य आहे. पुस्तकात संघर्ष , प्रेम आणि यशाचा किनाराही असून हे आत्मकथन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या प्रकाशन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. दिलीप शिंदे, डॉ. देवदत्त देशपांडे यांनी केले आहे.