नांदेड l शहरातील अनुदानापासून वंचीत राहिलेल्या पूरग्रस्तांच्या व इतर प्रलंबीत मागण्यासाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तथा राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ.लता गायकवाड आणि कॉ.प्रेमला पतंगे यांनी दि. ९ डिसेंबर रोजी मनपा, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून आमरण उपोषणाची सुरवात केली होती.


राहिलेल्या पूरग्रस्तांचे पंचनामे महापालिकेने तात्काळ तहसील कार्यालयास पाठवावेत व सानुग्रह अनुदान पीडित पूरग्रस्तांना देण्यात यावे.ही प्रमुख मागणी उपोषणार्थीची होती. उपरोक्त मागणीसाठी सीटू आणि जमसं च्या वतीने ५५ आंदोलने करण्यात आली आहेत.

परंतु मागण्याची दखल मनपा आयुक्त घेत नसल्याने शेवटी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरवात केली होती. माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे मागील ५५ ते ६० वर्षात नवीन प्लॉट्स पाडण्यात आले नसल्याने गावातील अनेक कुटुंबीय जंगलात व दऱ्या खोऱ्यात राहत आहेत. तर काहींनी इतर जिल्ह्यात व राज्यात स्थलानंतर केले आहे.


वझरा गावा शेजारी घनदाट जंगल असल्यामुळे हिंश्र प्राण्यांचा नेहमीच वावर असतो त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पेसा ग्रामपंचायत असलेल्या वझरा येथे नवीन प्लॉट्स पाडून द्यावेत व घरकुल साठी किमान पाच लाख रुपये मंजूर करावेत असा ठराव विशेष ग्रामसभेने पास केला आहे.पेसा ग्रामपंचायतचा ठराव तात्काळ मान्य करणे कायदा आहे परंतु येथे अंमलबजावणी होत नाही.

दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केल्या नंतर निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी उपोषणाची दखल घेतली असून राहिलेल्या पूरग्रस्तांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे पत्र मनपा आयुक्त यांना काढले असून माहूर तहसीलदार यांना फोन करून तातडीने योग्य कारवाई करण्याचे निर्देश देऊन आश्वासन दिले आहे.
त्या आश्वासना नंतर उपोषणार्थी कॉ. लता गायकवाड व कॉ. प्रेमला पतंगे यांनी उपोषणास स्थगती दिली आहे. अशी माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ.लता गायकवाड यांनी दिली आहे.

