Homeनांदेडवगळलेल्या लाडक्या बहिणींसाठी नांदेडमध्ये जनवादी महिला संघटनेचा धडक मोर्चा

वगळलेल्या लाडक्या बहिणींसाठी नांदेडमध्ये जनवादी महिला संघटनेचा धडक मोर्चा

हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; ३ नोव्हेंबरला मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढणार – कॉ. नसीमा शेख

नांदेड, अनिल मादसवार| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे वगळण्यात आलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. म. फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथून महिला व बालविकास कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

योजनेसाठी पात्र असूनही केवायसी, कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे अनेक महिलांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या महिलांना पुन्हा संधी देऊन त्यांचे अर्ज स्वीकारावेत, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा आणि पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ सुरू करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

वंचित महिलांचे अर्ज शासनाकडे सादर करणार

जनवादी महिला संघटनेने योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. मोर्चादरम्यान या अर्जदार महिलांची यादी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली. पात्र महिलांना न्याय मिळेपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

३ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक

मोर्चाला मार्गदर्शन करताना जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव मंडळ सदस्या प्रा. सुनंदाताई तिडके यांनी शासनाने महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी देऊन त्यांचे अर्ज स्वीकारावेत आणि प्रलंबित लाभ तातडीने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉ. नसीमा शेख यांनी महिलांना संबोधित करताना, लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांनी निराश होऊ नये, असे आवाहन केले. राज्यभर वंचित महिलांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू असून, पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना ठामपणे लढा देत आहे, असे त्यांनी सांगितले.

“पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असा निर्धार व्यक्त करत ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मोर्चात नांदेड जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. नसीमा शेख यांनी केले. तोपर्यंत जिल्ह्यातील वगळलेल्या महिलांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या मोर्चाचे नेतृत्व जनवादी महिला संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षा तथा राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. लता गायकवाड, कार्याध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा सचिव कॉ. सुनीता बोनगीर, उपाध्यक्षा कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. मीना आरसे, कॉ. संगीता गाभने आणि कॉ. मेघाताई गऊळकर आदींनी केले.

मोर्चाला सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, जातीअंत संघर्ष समितीचे सहनिमंत्रक डॉ. आदिनाथ इंगोले, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. दिगंबर काळे आणि कॉ. राहुल नरवाडे यांनी पाठिंबा दिला. यावेळी महिला नेत्यांनी शासनाच्या महिला धोरणावर तसेच लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या पात्र महिलांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. वंचित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments