नांदेड| कंधार तालुक्यातील शिरशी खुर्द येथे जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात तब्बल एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी जाहीर केले. “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या संकल्पनेला बळ देत पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवून भूजलस्तर वाढवणे, मृदा धूप रोखणे आणि उत्पादनक्षमता सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.


हाय-इम्पॅक्ट वॉटरशेड प्रकल्पाचा प्रभाव
मनरेगा व भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांत मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविला जात आहे. कंधार-मुखेड तालुक्यांमधील प्रकल्प अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार यांच्या माध्यमातून अंमलात आणला जात आहे. प्रकल्पांतर्गत 35 गावांसाठी वैज्ञानिक पद्धतीने पाणलोट आराखडे तयार करण्यात आले असून जलसंधारण, मृदासंधारण आणि शाश्वत शेती या तिन्हींचा समन्वित विकास साधण्यास प्राधान्य दिले जात आहे.


जलतारा – साधी पण प्रभावी रचना
शेतातील पाण्याचा नैसर्गिक झोत अडवून भूजल वाढवण्यासाठी जलताराची रचना अत्यंत परिणामकारक आहे. 5 फूट रुंद, 5 फूट लांब व 6 फूट खोल खड्ड्यात दगडी सामग्री भरल्यास एक जलतारा तयार होतो.
एका जलताऱ्याची पाणी मुरविण्याची क्षमता तब्बल 3.60 लाख लिटर असल्याने विहिरी- बोअरवेलचे पाणी वाढते व पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होते. मनरेगा व HIMWP-MH प्रकल्पांतर्गत राबविलेल्या पिक प्रात्यक्षिकांशी या उपक्रमाची जोड दिल्याने ग्रामपंचायतींना मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन करता येत असून ग्रामीण रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे.



सेंद्रिय शेतीचा संदेश
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पेठवडज येथील सेंद्रिय शेती व गांडूळखत युनिटला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. रासायनिक इनपुटवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक संसाधनांवर आधारित पर्यावरणपूरक शेतीप्रणालीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक शेती आणि जलसंवर्धनाचा समन्वय भविष्यातील शेतीला बळ देणारा ठरेल, असेही ते म्हणाले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, कृषी अधिकारी श्री. गुट्टे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, मनरेगा विभागातील अधिकारी व कर्मचारी, उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पंजाबराव राजे (पेठवडज), जलतारा लाभार्थी नितेश कदम, अश्वमेध संस्थेची टीम, शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध विभागांच्या संयुक्त सहभागामुळे हा उपक्रम मृदा संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत शेतीसाठी प्रभावी पाऊल असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.


