हिमायतनगर /नांदेड| रामबाबू महाराज आदिवासी ग्रामीण विकास मंडळ वाळकेवाडीद्वारा संचलित मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळा ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुदान तत्वावर चालविली जाते. या शाळेचे संस्था चालक माधवराव वैद्य हे विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त असून, त्यांनी यापूर्वी या पदावर काम केलेले व विभागातील अनेक विद्यमान कार्यरत अधिकारी यापूर्वी वैद्य यांच्या अधिनस्त काम केलेले असल्याने शाळेतील बेकायदेशीर, नियमबाह्य कामाची पाठराखन करीत आहेत. आधीचे प्रभारी मुख्याध्यापक व सहशिक्षक गणपत दुधाडे यांचे अनेक महिण्याचे वेतन रोखले आहे. तक्रार केली असता, वरिष्ठ दखल घेण्यास तयार नाहीत.


हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळेत संस्था चालकाने शैक्षणिक पात्रता व अर्हता नसताना देखील सहशिक्षक दुधाडे यांचे अनेक महिण्यांचे वेतनही रोखले. शाळेत बेकायदेशीरपणे नातेवाईकांची पद भरती केली आहे. प्रयोगशाळा परिचरपदी पुतणे राजू मारोती वैद्य, कनिष्ठ लिपीक पदी सून शारदा महिपती पोटे, प्राथमिक सहशिक्षक पदी चुलत सून शारदा मोहन गायकवाड तर मदतनीसपदी प्रशांत सुरेश चौगुले यांना नियुक्त करण्यात आले आहे. यातील शारदा पोटे व प्रशांत चौगुले हे १ एप्रिल २०१८ रोजी नियुक्त झाल्यापासून आजपर्यंत शाळेमध्ये कर्तव्यावर हजर झाले नाहीत. मात्र वेतन नियमित काढले जाते.

शारदा गायकवाड ह्या शिक्षक पात्रता परिक्षा अपात्र असतानाही त्यांची प्राथमिक सहशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मदतनीस विठ्ठल जयराम उघडे यास संस्था चालकाच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून राबवून घेतले जाते. इतकेच नव्हे तर, सेवा कनिष्ठ असलेल्या मंदा सोपानराव लोंढे यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.


याआधी गणपत दुधाडे हे प्रभारी मुख्याध्यापक असताना त्यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करण्यास नकार दर्शविला असता, त्यांची प्रभारी मुख्याध्यापक पदावरुन उचलबांगडी करुन इयत्ता नववीचे वर्ग शिक्षकपद देण्यात आले. परंतु या वर्गात जे विद्यार्थी अनुपस्थित होते, त्यांची उपस्थिती हजेरी पटावर नोंदविण्यास सांगत असत. मात्र सहशिक्षक दुधाडे यांनी त्यासह नकार दिल्याने वर्ग शिक्षक पदही काढून घेण्यात आले. दुधाडे यांनी संस्था व शाळेचा नियमबाह्य कारभार पत्रव्यवहार करुन पुराव्यानिशी प्रशासनाच्या लक्षात आणून दिला असतानाही प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. याबाबत संस्थाचालक वैद्य यांच्याशी संपर्क केला असता प्रत्यक्ष भेटून सविस्तर सांगतो असे म्हणत बोलणे टाळले.

सहशिक्षक गणपत तुळशिराम दुधाडे यांचे सप्टेंबर-२०२४ व मार्च-२०२५ ते जुलै-२०२५ चे वेतन अद्याप अदा करण्यात आले नाही. त्यांना शिक्षक उपस्थिती पटावर ११ डिसेंबर २०२४ पासून स्वाक्षऱ्या करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे दुधाडे यांनी १३ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड यांना दिला आहे.
हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेतील कथित नियमबाह्य व बेकायदेशीर पदभरती, नातेवाईकांना दिलेल्या नियुक्त्या आणि सहशिक्षक गणपत दुधाडे यांच्या वेतन रोखण्याच्या प्रकरणाबाबत आहे.
संस्थेवर आरोप
संस्था चालक माधवराव वैद्य (माजी प्रादेशिक उपायुक्त) यांनी नातेवाईकांना शाळेत विविध पदांवर नियुक्त केल्याचा आरोप. नियुक्त झालेल्यांपैकी काहीजण कधीही प्रत्यक्ष हजेरीवर आले नाहीत, तरीही त्यांचे वेतन घेतले गेले. अपात्र उमेदवारांनाही शिक्षक पद दिल्याचा आरोप.शिक्षक गणपत दुधाडे यांचे प्रकरण
नियमबाह्य कामांना विरोध केल्यामुळे दुधाडे यांना मुख्याध्यापक पदावरून हटवून वर्ग शिक्षक पदावर नेमले, नंतर ते पदही काढून घेतले. सप्टेंबर 2024 पासून आणि मार्च 2025 ते जुलै 2025 या कालावधीतील वेतन अद्याप न दिल्याचा आरोप. ११ डिसेंबर 2024 पासून हजेरी पत्रकावर सही करण्यासही मज्जाव. त्यामुळे 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दुधाडे यांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

