नांदेड| जिल्हा परिषद नांदेड येथे हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाची 2025 या वर्षीची थीम “सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग-सर्वसमावेशक समाज घडविणे” अशी आहे.


यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) राजकुमार मुकावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दत्तात्रय गिरी, कृषी अधिकारी निलकुमार एैतवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना फुटाने, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, तसेच विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या व श्री गुरूगोविंद सिंघजी निवासी अंध विद्यालय समर्थनगर धनेगाव या विद्यालयातील अंध दिव्यांग विद्यार्थी-कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.


जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळांतील मुख्याध्यापक-व्यवस्थापकीय अधीक्षक यांची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली होती.


शाळा, कार्यशाळेमध्ये दिव्यांग कल्याण विभागाची दृष्टी, ध्येय, उद्दिष्टे आणि धोरणात्मक लक्ष इत्यादी बाबत विस्तृतपणे सादरीकरण करण्यात यावे विभागाच्या योजना, कार्यक्रम, विभागाचे धोरणे, कायदे, नियम तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि संबंधित अधिनस्थ कार्यालये यांची रचना, स्वरूप, भूमिका, जबाबदाऱ्या आणि कार्य इत्यादीबाबत दिव्यांगांमध्ये जागृती होण्यासाठी विविध कार्यशाळा आणि कार्यक्रमांचे आयोजन करावे.

भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकास याबाबत मार्गदर्शन करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.


