नांदेड l शहरातील पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआयचे मागील अनेक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिके समोर बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे.


जन संघटनांच्या मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी शकडो पूरग्रस्तांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा आयुक्त यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांची उपस्थिती होती.


माकपच्या शिष्टमंडळाच्या वतीने २०० पानाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शहरातील हजारो पूरग्रस्त सानुग्रह अनुदानापासून वंचीत आहेत. आणि मनपाच्या वसुली लिपिक आणि तहसीलच्या तलाठी यांनी चिरीमिरी घेऊन १४ हजार बोगस पूरग्रस्तांची यादी पात्र ठरवून अनुदान वाटप केले आहे.


सन २०२४-२५ च्या पात्र यादीतील पूरग्रस्तांचे ४ ते ५ हजार बाधितांचे अकाउंट डिटेल्स चुकीचे लिहल्यामुळे अनुदान रक्कम पीडितांना प्राप्त झाली नाही. यादी तयार करण्यात हयगय करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून सेवेतून निलंबित करावे, सीटू कामगार संघटनेच्या वतीने सादर केलेल्या यादीतील अर्जदारांचे पंचनामे करून अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करावीत. बील कलेक्टर व तलाठी यांनी अनियमितता केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबले आहे त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी. या प्रमुख मागण्यासह इतरही विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री गिरीष कदम यांनी पंचनामे करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री डॉ. मिर्झा बेग यांना दिले असून पुढील आठ दिवसात खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ. जयराज गायकवाड, कॉ.सचिन वाळूळकर,कॉ.राहुल नरवाडे,कॉ. सुभाषचंद्र गजभारे,कॉ. सूरज सरोदे, कॉ.पंढरी बरुडे आदींनी केले. कॉ.इरफान पठाण यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.


