हिमायतनगर, अनिल मादसवार| सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने निसर्गाचा अद्भुत चमत्कार ठरलेला सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत असून, पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरत आहे.


नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर तालुक्यासह विदर्भातील उमरखेड, ढाणकी परिसरात यंदा चार ते पाच वेळा मुसळधार पाऊस झाला. त्यासोबतच ईसापुर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मराठवाडा-विदर्भ सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे.



याच नदीच्या प्रवाहावर अवलंबून असलेला सहस्रकुंड धबधबा चौथ्यांदा ओव्हरफ्लो होऊन प्रवाहीत झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर नदीचे पाणी प्रचंड वेगाने वाहू लागले असून, शेकडो फूट उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे फवारे अंगावर येताच पर्यटकांच्या अंगावर शहारे येत आहेत.



शनिवार-रविवारी हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी दूरवरून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. परिसर हिरवाईने नटल्याने व धबधब्याचा कर्णमधुर आवाज घुमल्याने पर्यटकांचे मन प्रसन्न होत असून, या रम्य निसर्गदर्शनाचा आनंद घेत डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.



