नांदेड | नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात मटका, गुटखा, अवैध देशी, विदेशी दारू, जुगार अश्या अनेक प्रकारच्या अवैध धंद्यानी थैमान घातले आहे. अवैध धंद्यापोटी दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असून, अवैध धंदे वाले गब्बर होत आहेत. तर व्यसनाधीन झालेल्या नागरीकांना मात्र आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. परिणामी अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. त्यामुळे मिलन जेऊ देईना… आणि कल्याण झोपू देईना… अशी अवस्था मटका बहाद्दरांची झाली असल्याने हिमायतनगर येथील एका युवकाने या अवैद्य धंदयांच्या विरोधात बंड पुकारले आहे. आत्तापर्यंत स्थानिक पोलिसांना निवेदन देऊन देखील एकही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मनोज उर्फ बंटी गुड्डेटवार यांनी उपविभागीय अधिकारी यांनानिवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात राजकीय वरदहस्ताने जागोजागी मुख्य चौकात मटका बुक्या, जुगार अड्डे व अवैद्य देशी विदेशी दारू विक्रीचा गोरखधंदे चालू आहेत. चौका चौकात चालत असलेल्या मटक्यामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर येत आहेत. मटका लागेल म्हणून अनेक जन आपल्या घरून महिलांनी रोजंदारीवर काम करून आणलेला पैसा कल्याण, मिलन, डे नाईट यावर लाउन उडवीत आहेत. दिवसरात्र मटक्याची आस लावून बसलेल्या अनेकांचा शेवटी भ्रमनिरास होवून ते आपली मानसिक स्थिती बिघडवून घेत आहेत.



त्यामुळे मिलन जेऊ देईना… आणि कल्याण झोपू देईना… अशी अवस्था मटका बहाद्दरांची झाली आहे. राजकीय वरद हस्ताने चालविल्या जाणाऱ्या या मटक्याच्या धंद्यातून स्थानिक पोलीसांना माहेवारी हप्ता मिळत असल्यामुळे की, काय? पोलीस मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. हिमायतनगर शहरातील अवैद्य धंद्याची तक्रार दिल्यानंतर मटक्याचा धंदा आकारणाऱ्याकडून धमक्या आल्या असल्या तरी मी त्यांना भीक घालत नसल्याने आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला असल्याचे मनोज उर्फ बंटी गुड्डेटवार यांनी सनीतले आहे.


तरीदेखील हिमायतनगर शहर व तालुक्यातील मटकेवाले बेडर होवून आपला जम बसवित राजरोसपणे जुगार, मटका चालवीत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने माहेवारी कोट्यावधी रूपयांच्या महसूलाला लाथ मारून राज्यात गुटखा प्रतिबंधित केला. परंतू हिमायतनगर शहरात गुटखा मोठ्याप्रमाणात आयात करण्यात येऊन साठवणूक केली जात आहे. अनेकांनी आपला धंदा जोमात चलावा म्हणून अन्न औषध प्रशासन व स्थानिक प्रशासनाला मॅनेज केल्यामुळे की, काय कारवाई करायला कुणीच पुढे येत नसल्याने हा सर्व प्रकार अलबेल असाच चालू आहे.


हिमायतनगर शहरात अंदरबाहर, गंजी पत्ता क्लब देखील राजरोसपणे चालविले जात आहेत. अश्या प्रकारे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात अवैध धंद्यानी थैमान घातले आहे. हे सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे. म्हणून या अगोदर दोन तीन वेळा हिमायतनगर पोलिसांना निवेदन दिले होते. परंतू कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पुन्हा शहरात मटका, जुगार अड्डे, गुटखा, अवैद्य देशी विदेशी दारूची विक्री असे धंदे चालू असल्याने अनेकजण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे गोरगरीब घरच्या महिला मंडळी त्रस्त झाल्या असून, त्यांचे संसार देशोधडीला लागण्यापासून वाचविण्यासाठी चार दिवसात हिमायतनगर शहरातून अवैद्य धंद्यासह मटका हद्दपार झाला नाही तर हिमायतनगर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा मनोज उर्फ बंटी गुड्डेटवार यांनी दिनांक २९ जुलै रोजी निवेदनातून दिला असून, या निवेदनाची प्रत अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्यासह वरिष्ठाना पाठविली आहे.


