नांदेड| मतदानासाठी घरी पैसे येऊनही त्यांना ठाम नकार देणाऱ्या प्रामाणिक आणि निर्भय मतदारांचा नांदेडमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. ‘जसा मतदार तसा नेता’ या लोकशाही मूल्ये जपणाऱ्या उपक्रमामुळे समाजात आशेचा नवा किरण निर्माण झाला असून, मतविक्रीच्या प्रवृत्तीला थेट आव्हान देण्यात आले आहे.


सध्याच्या काळात मतदानासाठी पैसे घेण्याची प्रवृत्ती वय, जात, धर्म, शिक्षण, सामाजिक दर्जा अशा सर्व भेदांवर मात करत समाजात खोलवर रुजलेली दिसून येते. मतदानासाठी पैसे घेणे हे कायद्याने गुन्हा, नैतिकदृष्ट्या चुकीचे व लोकशाहीस घातक असले, तरी अशा घटना सर्रास घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर “मी मतदानासाठी पैसे घेतले नाहीत” असे ठामपणे सांगणाऱ्या मतदारांची संख्या अत्यल्प होत चालल्याची चिंताजनक स्थिती आहे.

अशाच निराशाजनक वातावरणात दि. 13 जानेवारी 2026 रोजी मतदानासाठी पैसे देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना पैसे नाकारून त्यांना जाब विचारणाऱ्या जागरूक मतदारांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दि. 15 जानेवारी 2026 रोजी पैसे न घेता मतदान करणाऱ्या मतदारांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात रुजलेल्या “मत विक्री”च्या प्रवृत्तीला ठोस आणि सकारात्मक संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध दैनिके व माध्यमांद्वारे मतविक्रीच्या गंभीर प्रश्नावर अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली. चळवळीतील उपेक्षित “बाप” माणूस या पुस्तकाच्या लेखिका ल. बा. थोडापुरकर यांनी लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी स्वाभिमान, निर्भयता व नैतिक मूल्ये जपणे किती आवश्यक आहे, हे प्रभावीपणे अधोरेखित केले. त्यांच्या विचारांना उपस्थित बुद्धिजीवी वर्गाकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.


प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, ॲड. धोंडीबा पवार आणि सीमा भाग समन्वयक गोविंद मुंडकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी डॉ. शिवदास हमंद यांच्यासह पैसे न घेता मतदान करणाऱ्या अनेक स्वाभिमानी मतदारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, बी. आर. कदम आणि संजय बेळगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, चांगले मतदार असतील तरच चांगले नेते घडतात. जसे मतदार, तसे नेते आणि तसा देश, हे लोकशाहीचे अटळ सत्य आहे.
लोकशाही केवळ मतदानाचा हक्क बजावल्याने बळकट होत नाही, तर निर्भय, प्रामाणिक आणि स्वाभिमानी मतदानातूनच ती खऱ्या अर्थाने सक्षम होते, हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे पुढे आला. पैसे नाकारून लोकशाही मूल्ये जपणाऱ्या मतदारांचा झालेला सत्कार समाजाला नवी दिशा देणारा ठरला असून, आजच्या काळात अशा प्रेरणादायी उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

