नांदेड| नांदेडमधील गुरुकुल पब्लिक स्कूल ही शाळा अनपेक्षितपणे बंद करण्यात आल्यामुळे, या शाळेला संलग्न असलेली ‘राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना’ देखील ठप्प झाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सुमारे १५० विद्यार्थ्यांवर झाला असून ते शिक्षणापासून वंचित झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


या घटनेविरोधात मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या समोर उपोषण करत आहेत. त्यांच्या मागण्या स्पष्ट असून, शाळा व वसतिगृह पुन्हा सुरू करावेत आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा मार्गी लावावे, हा त्यांचा ठाम आग्रह आहे.


गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत एक महत्त्वाची शैक्षणिक सुविधा होती. विद्यार्थ्यांना येथे निवासासह शिक्षणाची संपूर्ण सोय करण्यात आली होती. मात्र, शाळा बंद झाल्यामुळे वसतिगृहातील मूलभूत सेवा देखील बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण थांबवावे लागत आहे.


यासंदर्भात ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, प्रदीप सरोदे, बालाजी गडदे, कुबीरराव भुतनर, बळवंत मस्के, विठ्ठल हाके, अशोक लाकडे, मारोती डोके, मारोती चितंले, अश्विन नाईक आदींनी शासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, शासनाने पर्यायी शिक्षण व्यवस्था व नवीन वसतिगृह सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात आणि संबंधित शाळा व्यवस्थापनावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा हा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.



