नांदेड| राज्यपाल सी.पी राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड येथे आगमन झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभासाठी ते नांदेडला आले आहेत. सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर आगमन झाले.


यावेळी आमदार श्रीजया अशोक चव्हाण,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आदी उपस्थित होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ दीक्षान्त समारंभ २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूषण पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदचे सर्व सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.

याप्रसंगी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी हा बहुमान परभणी येथील बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु. श्रद्धा हरहरे यांना मिळणार आहे.. श्रध्दा हरहरे यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सत्ताविसाव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील एकूण २१०५५ विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी, पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये १८० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभाच्या दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक समिती आप-आपली कार्य पूर्ण करीत परिश्रम घेत आहेत.

सोमवारी लोकशाही दिन
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवन येथे सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्यामार्फत आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 पूर्वी आपल्या तक्रारी, निवेदने, जमा करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यावेळेस 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून तक्रार करणाऱ्यांनी आपले निवेदन सादर करायचे आहे. त्यानंतर लगेचच तक्रार निवारणाचे काम सुरू होईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024 ही रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील 48 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत एका सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडीओ, लॅपटॉप, तत्सम वस्तू वापरण्यास व बाळगण्यास, तसेच सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.