नांदेड/मुदखेड | नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे गुरुवारी एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंबातील वडील रमेश होनाजी लखे ( 55 ) आणि आई राधाबाई रमेश लखे (48) आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले, तर त्यांची दोन मुले उमेश रमेश लखे(२५), बजरंग रमेश लखे (22) हे दोघेकाही किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर मृत अवस्थेत सापडली. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून तपास अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



