नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या नांदेड येथील कारकीर्दस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा कार्यालयात सत्कार करण्यात आला. समग्र शिक्षाचे लेखाधिकारी परमेश्वर माळी, सहायक लेखाधिकारी श्रीपाद जोशी, उप शिक्षणाधिकारी संतोष शेटकार, प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, साहेब पांचाळ, रामदास वाघमारे, प्रकाश गोडणारे, प्रशांत सोनक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. सविता बिरगे यांनी तीन वर्षात वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. शालेय गुणवत्ता विकास, विद्यार्थी उपस्थिती जगण्यासाठी लोकसहभाग, शिक्षकांचे विविध प्रशिक्षणाद्वारा समृद्धीकरण, तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरण, वेध भविष्याचा हा शैक्षणिक प्रयोग, ऑपरेशन गगन भरारी, चला शिकूया प्रयोगातून, एक तास वाचनाचा असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले.
शिक्षक काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे प्रशासनाचे कर्तव्य असते. या भावनेतून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. निवड श्रेणी अनेक वर्षापासून रखडलेली होती. यावर्षी 1138 शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात आली आहे. तसेच 450 शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी बहाल केली आहे. 292 शिक्षकांना दर्जोन्नती, पवित्र पोर्टलमध्ये 297 शिक्षक या जिल्ह्यास नव्याने मिळाले आहेत.
वेगवेगळ्या पदोन्नती देऊन संबंधित आस्थापना समृद्ध केली आहे. 133 शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापक, 63 शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली आहे. शाळास्तरावरील गरज लक्षात घेता शासनाने निश्चित केल्यानुसार सेवानिवृत्त 51 शिक्षकांना आदिवासी भागात पदस्थापित केले आहे. अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या चाचण्या, विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे लिहिता वाचता यावे यासाठी शासनाने सुरू केलेला महावाचन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळांनी केलेल्या कामांची नोंद घेऊन बक्षीसे देण्यात आली त्यातून शाळा समृद्ध होऊ लागलेली आहे. ऑपरेशन गगन भरारी या उपक्रमात लोक सहभाग मोठ्या प्रमाणात मिळवता आला. लोकसभागातून शाळांची दुरुस्ती, आवश्यक कामे, ग्रंथालयांना पुस्तके मिळविण्यात आली आहेत.
शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविल्यामुळे शाळा शिक्षकांना शाळांवर लक्ष अधिक केंद्रित करता आले आहे. तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षणाभिमुख प्रशासन केले आहे. हे काम करताना वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे सातत्याने मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे. यापुढे शिक्षण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगीतले.